टकले मास्तर.

                            त्या बैठकीत "मराठी माणूस धंदा करू शकतो कां?" याविषयावरील चर्चा मुद्यावरून गुद्यावर आली. कारण होते टकले मास्तर. अतिशय प्रामाणीक व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणुन ख्याती व तितकेच हटवादी.
                           खरेतर महिन्याचं सामान वाण्याकडून घेण्याऐवजी घाउक बाजारातुन आणुन वाटप केलेतर किती स्वस्त पडेल याविषयी मते जाणुन घ्यायला सगळे जमले होते व त्यातच मराठी माणसाने एखादे दुकान थाटावे यावर ती चर्चा घसरली. व मुद्दे सोडुन गुद्दे मधे आले.
                           त्यातच टकले मास्तर म्हणाले मी थाटतो दुकान बघुया तुमच्यापैकी किती जण माझ्याकडुन सामान घेतात.
                            मास्तरांनी दुकान थाटले. इतरांच्यातुलनेत स्वस्त व चोख सामान मिळते म्हणुन ख्याती मिळवण्यात मास्तर यशस्वी झाले. जुना लौकिक होताच, त्यात दुकानामुळे मास्तरांना गावच नाही तर आजुबाजूच्या खेड्यातुनही लोक ओळखू लागले.
                            मास्तरांनी एकाची चार दुकाने केली व आपला शब्द खरा केला.
                           आज मास्तर नाहीत. त्यांची मुलगी व भाचे दुकाने सांभाळतात. पण दुकाने ओळखली जातात टकले मास्तरांच्याच नावाने.
 

रमेश.

रमेश, एक अजब रसायन. कधी, कसा भेटला आठवत नाही. पण बडबड्या स्वभावामुळे चांगलाच लक्षात राहिला.
एक दिवस माझ्याकडे आला. म्हणाला. वेळ आहे कां? मला थोडे बोलायचे आहे. कार्यालयाची वेळ संपत आली होती त्यामुळे त्याला थांबवले व सुटल्यावर चहासाठी घेउन गेलो.
चहा पित असतांनाच तो आपली कथा सांगायला लागला. घरचा अत्यंत गरीब. वडिलांचा लहानसा व्यवसाय. त्यातच त्यांना दारूचे व्यसन लागले. त्यामुळे बायको मुलांना मारणे आलेच.
आज म्हणाला मला वडिलांनी घर सोडायला सांगीतले आहे. म्हणतात शिक्षण सोड आणी दुकान सांभाळ. शेवटच्या वर्षाला असल्याने हा सोडायला तयार नाही, म्हणुन घर सोड हा त्यांचा हट्ट.
मला म्हणाला, मला तुमची मदत हवीय. माझी शेवटच्या वर्षाची फी फक्त भरा. मी तुम्हाला परत करेन. तुमचा विश्वास नसेल तर मला एकही पैसा देउ नका, माझ्या महाविद्यालयात भरा. मी तयार झालो व फि भरली.
वर्षभर रमेशने काहितरी काम करून खर्च सांभाळला. चांगल्याप्रकारे उत्तीर्ण झाला व नमस्कार करायला आला. लग्नाचे आमंत्रण द्यायला विसरला नाही. यादरम्यान पैसेही परत केलेत.
आज त्याचा फोन आला होता. मुलगी झाल्याचे सांगायला. वडिलांबद्दल म्हणाला. आता त्यांची दारू सुटली व दुकानही चांगले चालतेय.
रमेशचे कधीतरी फोन येतात प्रगती सांगायला.



निर्मला काकू

           
            आमच्या निर्मला काकू नावाप्रमाणेच निर्मल. आमच्या लहान पणी काकूने आमच्या सगळ्या छळाला कायम ह्सुनच उत्तर दिले. आणी आई रागावल्यास सांगायची "अग जाउ दे लहान मुले आहेत मस्ती करणारच".
            काकू सुट्टीत गावी गेल्यावर तिची वाट बघणे आम्हाला फारच त्रासदायक वाटायचे. ती होतीच तशी येताना आमच्यासाठी तिच्या पिशवीत भरपूर काहीतरी आणायचीच.
            निर्मला काकूंना मी कायम हसतमुख बघीतले आहे. सकाळी लौकर उठणे, फिरायला जाणे  येताना भेटणार त्याच्याशी गप्पा व फुले आणणे, फूले देवासमोर ठेवताना नमस्कार करणे व इतर कामाला लागणे  तिचा आवडीचा कार्यक्रम.
            त्या दिवशीपण कार्यक्रम असाच सुरू झाला. काकू परत आल्या व देवासमोर वाकल्या. बराच वेळ उठल्या नाहीत म्हणुन वहिनी बघायला गेल्या तर...........
            काकू नमस्कार करताना देवाकडेच गेल्याहोत्या कायमच्याच..............

 

कवि आणी कविता.

                            माझा एक मित्र बरेच वर्षे माणसात होता. माणसात होता म्हणजे सामान्य माणसा सारखाच वागायचा. काही दिवसांपूर्वी त्याला कविता करायची उर्मी जागी झाली आता तो भेटेल त्याला त्याने केलेल्या कविता ऐकवत फिरतो.
                            बर कविता कशावर करावी याच अशा कविंवर बंधन नसते. त्यानेतर आपल्या बायको मुलांनाही सोडले नाही ! तेही त्याच्या कवितांचे विषय आहेत.
                            असाच परवा भेटला बरेच दिवसांनी. खरतर टाळणारच होतो मी त्याला पण....
                            त्याने मला विचारले अरे तुझ्याकडे थोडा वेळ आहे कां? मला तुझी थोडी मदत हवीय. मी म्हणालो ठिकाय थोडा वेळ द्यायला हरकत नाही. तर पठ्याने माझे ४ तास खाल्ले. नविन केलेल्या सगळ्या कविता ऐकवूनच मला सोडल.
                            त्याची एक कविता होती आमच्याच एका हल्लीच देवाघरी गेलेल्या सोबत्यावर, ज्याचे याचाशी कधिही जमले नाही त्याच्यावर......
                   

मला मराठीत लिहायचय !

नमस्कार,
बरेच दिवस विचारच करीत होतो कि मराठीत काही लिहाव. काय लिहाव याचाच विचार करताना मनात आले आपल्याला बरीच माणसे भेटतात. अशाच वल्लींवर लिहीता येइल.
तर तडक आज हा Blog तयार केला आणी माझ्या मराठी बांधवांना (हो भगीनी सुध्धा) भेटायला एक जागा तयार झाली.
माझं लेखन आवडल तर कळवा आणी नाही आवडल तरीही ! आपले विचार Comment मधे द्यायला विसरु नका.
तर नियमीत भेटत राहूया इथेच.

दिनेश.