भुताटकी .

 आम्ही जिथे रहात होतो त्या तेथील पन्नास वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. सर्व घरे एका रांगेत होती . पण चाळ नव्हती. 


आमच्या समोरील इमारती  मध्ये तळ मजल्यावर कोपऱ्यात  एक कुटुंब रहात होत. तेथील घरात अचानक काही दिवसांनी घाबरून टाकणारा प्रकार सुरु झाला. सर्व झोपल्यावर रात्री 12 वाजल्या नंतर त्यांची अचानक स्वयंपाक घरातील  मधील दिवे  चालू व्हायला लागले . त्यांना वाटलं हा काहीतरी भुताटकीचा प्रकार असला पाहिजे. म्हणून त्यांनी घाबरून थोड्याच दिवसात घर  विकून  दुसरीकडे राहायला गेले.


त्या नंतर तेथे दुसरे कुटुंब राहावयास आले. ते आल्यावर त्यांनाही त्यांनाही तसाच  अनुभव आल्यानंतर ते देखील घर  विकून दुसरीकडे रहावयास गेले.


आता तेथे दक्षिणेकडील कुटुंब राहायला  आले. ते आल्यावर सुद्धा दिव्यांचा  रात्रीस खेळ चालू झाला. शेजारी चौकशी केल्यावर हा भूत बाधेचाच प्रकार आहे असे सांगण्यात आले. मग काही दिवसांनी त्यांनी कुठल्या तरी मोठया साधू महाराजांना वाजत गाजत आणून, भुताचा बंदोबस्त करण्यासाठी होम पेटवून मोठी पूजा घातली.


पूजा घातल्या नंतर दोन दिवस बरे गेले आणि पुन्हा तिसऱ्या दिवसापासून तोच  खेळ सुरु झाला. आता मात्र त्यांची झोप उडाली. एवढा खर्च करून साधू महाराजांना आणून का फरक पडत नाही असं त्यांना वाटू लागलं. त्या कुटुंबातील कर्ता पुरुष थोडा धीट होता. त्याने याचा शोध घ्यावचे  ठरविले .


एके रात्री सर्व झोपल्यावर तो काठी आणि टॉर्च हातात घेऊन किचनच्या दरवाजा जवळ उभा राहिला. रात्रीचे बारा वाजून गेले होते. त्याच लक्ष लाईट कधी लागेल याच्याकडे होतं. थोडया वेळाने लाईट चालू झाल्याबरोबर त्याने टॉर्चचा प्रकाश लाईटच्या बोर्डाकडे मारला. आणि त्याने बोर्डाकडे पाहिलं त्या बरोबर लाईट का चालू होत असे याच उत्तर त्याला मिळालं.


होत होते असं की, त्यावेळी लाकडी  पट्टीवर क्लिप मारून वायरिंग केलेली असे व गोल जुन्या टाईपचे काळे खटक्यावाले ऑन ऑफ स्विच बाहेरून बोर्डावर बसविलेले असत . रात्री सर्व सामसूम झाली की एक उंदीर मामा त्या पट्टी वरून खाली येत असे व स्विच वरून पुढे जात असे. ज्यावेळी तो स्विच वरून जात असे त्या वेळी स्विचचा खटका पडून तो स्विच चालू होत असे आणि दिवे  लागत असत . 


दुसऱ्या दिवशी पिंजरा लावून त्याने उंदीर मामाचा बंदोबस्त केला. त्यांनतर कधी त्या घरात अचानक रात्रीची दिवे लागले  नाही व अश्या तर्हेने बाळगलेल्या भुताच्या संकल्पनेचा शेवट झाला.