रमेश.

रमेश, एक अजब रसायन. कधी, कसा भेटला आठवत नाही. पण बडबड्या स्वभावामुळे चांगलाच लक्षात राहिला.
एक दिवस माझ्याकडे आला. म्हणाला. वेळ आहे कां? मला थोडे बोलायचे आहे. कार्यालयाची वेळ संपत आली होती त्यामुळे त्याला थांबवले व सुटल्यावर चहासाठी घेउन गेलो.
चहा पित असतांनाच तो आपली कथा सांगायला लागला. घरचा अत्यंत गरीब. वडिलांचा लहानसा व्यवसाय. त्यातच त्यांना दारूचे व्यसन लागले. त्यामुळे बायको मुलांना मारणे आलेच.
आज म्हणाला मला वडिलांनी घर सोडायला सांगीतले आहे. म्हणतात शिक्षण सोड आणी दुकान सांभाळ. शेवटच्या वर्षाला असल्याने हा सोडायला तयार नाही, म्हणुन घर सोड हा त्यांचा हट्ट.
मला म्हणाला, मला तुमची मदत हवीय. माझी शेवटच्या वर्षाची फी फक्त भरा. मी तुम्हाला परत करेन. तुमचा विश्वास नसेल तर मला एकही पैसा देउ नका, माझ्या महाविद्यालयात भरा. मी तयार झालो व फि भरली.
वर्षभर रमेशने काहितरी काम करून खर्च सांभाळला. चांगल्याप्रकारे उत्तीर्ण झाला व नमस्कार करायला आला. लग्नाचे आमंत्रण द्यायला विसरला नाही. यादरम्यान पैसेही परत केलेत.
आज त्याचा फोन आला होता. मुलगी झाल्याचे सांगायला. वडिलांबद्दल म्हणाला. आता त्यांची दारू सुटली व दुकानही चांगले चालतेय.
रमेशचे कधीतरी फोन येतात प्रगती सांगायला.